Wednesday, July 13, 2016

वारी - एक रूपक ...


दुपार संपून दिवस संध्याकालाकडे कलू लागला. सूर्यनारायण मावळतीकडे मार्गस्थ झाले. आकाशाने भगवी शाल पांघरण्यास घेतली. चंद्रभागेचा परिसर भगव्या रंगाने उजळून निघाला. बऱ्याच वर्षानंतर एकमेकांना भेटलेले ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, एकनाथ, जनाबाई, मुक्ताबाई, चोखोबा, नरहरी, सावता, गोरोबाकाका, दिवसभर चंद्रभागेत डुंबले, वाळवंटात खेळ-खेळ खेळले अर्थात पांडुरंगही सोबत होताच, संध्याकाळ झाल्याबरोबर गोरोबाकाकांनी सर्वांना आवाज दिला, “ चला हरिपाठाची तयारी करा.” सार्वजण भराभर वाळवंटात गोल करून बसले. प्रत्येकाने आपापल्या झोळीतून पाट काढला, वाळू सारखी करून त्यावर पाट मांडला, पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरले व आपापला आणलेला देव – पांडुरंगाची छोटीशी मूर्ती – ठेवला , छोटीशी निरंजन लावली, उदबत्ती लावली, देवाला फुले - तुळशीची माळ वाहिली व हरिपाठाची तयारी केली. चोखोबांनी पखवाज घेतला, सर्वांनी हातात टाळ घेतले, नामदेवांनी वीणेचा सूर लावला, आणि हरिपाठाला सुरुवात करणार, तोच ज्ञानोबांचे पांडुरंगाकडे लक्ष गेले, तो नुसताच चुळबूळ करीत बसला होता. ज्ञानोबांनी विचारले, “ पांडुरंगा तुझा देव कुठे आहे ? चल मांड बर लवकर.” पांडुरंगाला प्रश्न पडला “ मी कुठून देव आणू ?” तो म्हणाला, “ अरे मीच तर देव आहे ना ? मी माझीच मूर्ती कशी मांडू ?” सर्वजण म्हणाले, “ ते काही नाही. तुला देव मांडावाच लागेल.” पांडुरंगही हट्टाला पेटला, “ मीच देव असतांना आणखी कोणता देव मांडू.” झालं वादाला सुरुवात झाली. मंडळी चांगलीच पांडुरंगाच्या मागे लागली. पांडुरंगही बदेना तोही मोठमोठ्याने वाद घालू लागला. “ मला देवाची काय गरज?” म्हणून आपले म्हणणे पटवून देवू लागला....
शेवटी संतांचा विजय झाला कुठल्याही शुभ कार्याला परमेश्वराचे अधिष्ठान हवेच हे देवांनी निसंदिग्धपणे पटवून दिले. पांडुरंगाने हार पत्करली, “ मी चुकलो तुम्ही द्याल ते प्रायश्चित्त घेण्यास मी तयार आहे. बोला मी काय करू?” देवाला पराभूत केल्याचं आगळच तेज प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर उमटले. सर्व प्रायश्चित्ताबाबत विचार करू लागले. देवाला प्रायश्चित्त द्यायचे होते त्यामुळे प्रत्येकाच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, बरा सापडला होता आज. बराच वेळ शांतता पसरली होती. शेवटी तुकोबांनी कोंडी फोडली. तुकोबा म्हणाले, “ मी सांगतो देवाला प्रायश्चित्त. हे बघ देवा तू आमच्याकडे नेहेमी राहतोस. अठ्ठावीस युगांपासून तू आमच्याकडे देव्हाऱ्यातच नव्हे तर आमच्या हृदयातही वास्तव्य करून आहेस.... आज आपण सर्व येथे एकत्र जमलो तर केव्हढा आनंद मिळाला.... असेच आपण वर्षातून काही दिवस एकत्र आलो तर किती आनंद अनुभवता येईल.... तेंव्हा मला असे वाटते की, वर्षातून कमीत कमी एक महिना तरी आम्ही इथे तुझ्याकडे येवून रहात जावू.... चंद्रभागेत यथेच्छ डुंबू , वाळवंटात विविध खेळ खेळू...... कशी वाटली माझी कल्पना ?” तुकोबा सर्वांकडे पाहून म्हणाले. सर्वांच्या चेहेऱ्यावरचा आनंद लपूच शकला नाही.... सर्वांनी एकच जल्लोष केला, नामदेवांनी तर उडीच मारली, गोरोबा हातात चिपळ्या घेवून चिखल तुडवावा तसे नाचू लागले, जनाबाई व मुक्ताबाई फुगड्या खेळू लागल्या, ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव, एकनाथ, सावता चोखोबाच्या पखवाजाच्या थापेबरोबर रिंगण करून नाचू लागले.....
पांडुरंगाचा चेहेरा मात्र हिरमुसला झाला होता. बराचवेळ आनंदोत्सव चालल्यावर सर्वांच कोपऱ्यात बसलेल्या पांडुरंगाकडे लक्ष गेले . “ पांडुरंगा तुला आनंद नाही झाला ?” सर्वांनी एका स्वरात विचारले. पांडुरंग कसनुस तोंड करून म्हणाला “ तस नाही रे मला तर खूपच आनंद झाला, पण तुम्ही सर्व येणार ! सोबत तुमच्या सवंगड्यांनाही घेवून येणार ! पण माझं गाव केव्हढ छोटसं आहे, एव्हढे सर्व मावणार कसे?” ...चोखोबा चटकन म्हणाले, “ वा रे वा, पांडुरंगा आमच्या छोट्याश्या लाकडी देव्हाऱ्यात तू वर्षानुवर्षे राहू शकतो, एव्हढेच काय मुठीएव्हढ्या हृदयातही राहू शकतो आणि तुझ्या गावात तुला आमची गर्दी वाटते काय रे ?” चोखोबाच्या युक्तिवादाला सर्वांनीच दाद दिली “ बरोबर आहे....आणि हे बघ, तुला प्रायश्चित्त घ्यायचे ना ?..मग ते काही नाही. आम्ही तुझ्याकडे येणारच !”... पांडुरंगाने विचार केला ही मंडळी काही आपलं ऐकणार नाही. शेवटी त्याने आपल्या मनातील भीती बोलूनच दाखविली, “हे बघा,.. तुम्ही सर्व महिनाभर येथे येणार, खेळणार, कुदणार, पसारा करणार, घाण करणार, मग माझी माउली - म्हणजे पंढरपूरवासी लोक – रागाविणार नाही का ? ती संतापणार नाही ? तिने मलाच हाकलून दिले तर मी कुठे जाऊ ?” देव अक्षरश: रडकुंडीला येऊन सांगत होता. मंडळी जरा गंभीर झाली. देवाचं बरोबर होतं. आपल्याला आपली मित्रमंडळी घरी आलेली , खेळलेली, कुदलेली, आवडतात, परंतु त्यामुळे झालेला पसारा आवरतांना आईची केव्हढी दमछाक होते, तिची किती चिडचिड होते. तासाभरासाठी आलेले मित्र एव्हढा पसारा करतात. इथेतर महिनाभर...
तेव्हढ्यात पांडुरंगानेच महिनाभर मुक्काम टाळण्यासाठी युक्ती केली. तो म्हणाला, “अरे तुम्ही असे का नाही करीत ? सर्व एकदम महिनाभर इथे वाळवंटात आलात तर खेळणार कुठे आणि कसे ?... त्यापेक्षा असे कराना महिनाभर आधी घरून माझ्याकडे यायला निघा... आणि हो ... पायीच निघा त्यामुळे रस्त्याने तुम्हाला खेळता येईल , बागडता येईल, वनभोजनाचा, मुक्कामी कीर्तनाचा, भारूडांचा आनंद पण घेता येईल आणि सर्वजण आपापल्या गावाहून असे निघा की बरोबर एकाच दिवशी सर्व येथे याल, तो एक दिवस मनसोक्त खेळायचे आणि पुन्हा आपापल्या घरी निघून जायचे” देवाची युक्ती सफल होत होती ... खेळायला मिळणार, कीर्तन, भारुड ऐकायला मिळणार, पायी चालायला मिळणार या आनंदात महिनाभर मुक्कामाचा सर्वांना विसर पडला.... तेव्हढ्यात सावत्याने विचारले, “ अरे पण तुझ्याकडे यायचा ‘तो’ एक दिवस कोणता ?” पांडुरंगाने विचार केला ... हीच संधी आहे ... असा दिवस सांगू की ,... यांना सर्वांना यायलाच जमणार नाही ... ‘तो’ दिवस शोधण्यात गढला आणि अचानक... त्याला सापडला... आषाढातील शुद्ध एकादशी.... आषाढ महिना म्हणजे पावसाची सतत रिपरिप चालू असणार ..... सर्वत्र पाणीच पाणी... चिखल... आणि यांचे सारे सवंगडी शेतकरी ते आपापल्या कामात मग्न असणार ते कशाला येतील शेती सोडून म्हणजे गर्दी कमी होणार .... व आपली माउली (पंढरपूरवासी लोक) सुद्धा खुश होईल ... पांडुरंग आपल्या चेहेऱ्यावरील आनंद लपवित म्हणाला “ आषाढ शुद्ध एकादशी” बरोबर या दिवशी तुम्ही सर्व माझ्याकडे पोहोचाल, असे निघा.” इतर कुणाच्या नाही पण सावताच्या चटकन लक्षात आले, तो म्हणाला “ देवा, अरे आषाढ म्हणजे आमच्या कामाचा महिना तेंव्हा कसे जमेल ?” देवाने ओळखले हा काही आपला बेत जमू देणार नाही. देवाने शेवटी भावनिक साद घातली, “ अरे मलाही ते समजतं, पण मी असे ठरविले आहे की, या महिन्यात तुमच्याशी खूप खेळायचे, थकायचे आणि आषाढी एकादशीला विश्रांतीसाठी निद्राधीन व्हायचे... चांगले चार महिन्यांसाठी ... म्हणजे मी नसल्याने तुमच्याकडे कुठली कार्ये होणार नाही... त्यामुळे तुम्ही शेतीच्या कामाला मोकळे .... चांगले कार्तिकापर्यंत...” या भावनिक युक्तिवादाचा चांगलाच परिणाम झाला. सर्वांना तो पटला... चार महिने शेतीला मिळणार म्हटल्यावर शेतकरीवर्ग चांगलाच सुखावला ... सर्व एकदमच तयार झाले..... मात्र ज्ञानोबांनी महत्वाचा विचार मांडला, “ अरे पण पांडुरंगा, मूळ विषय बाजूलाच राहिला आम्हाला सर्वांना तुझ्यासोबत खेळायचे आहे.... तू आम्हाला महिनाभर पायी चालायला सांगतोस आणि एकच दिवस पंढरपुरात बोलावितोस मग आम्ही तुझ्याशी खेळणार कसे ? आणि महिनाभर पायी चालल्याने थकून नाही का जाणार ?” सर्वांनी ज्ञानोबाच्या म्हणण्याला जोरदार पाठींबा दिला.
पंढरपुरातील गर्दी टाळण्यासाठी जमवून आणलेला मेळ विस्कटतो की काय ? या शंकेने पांडुरंगाने त्वरित सर्वांना आश्वस्त केले.    “ हे बघा, असे काही होणार नाही ... तुम्ही दिंडीने निर्जला एकादशीला पंढरपुराकडे पायी निघायचे. मी तुमच्या प्रत्येकाच्या दिंडीत सहभागी होईल तुमच्यासोबत खेळेल, नाचेल ! परंतु माझी एक अट आहे. मी माझ्या मूळ स्वरुपात येणार नाही... तुमच्यातलाच एक बनून येईल.... लहान मुलगा, मुलगी, तरुण, तरुणी, वृद्ध ....इतकेच काय अगदी घोडा, बैल, हत्ती, उंट, कुत्रा, मांजर, ..... अशा कोणत्याही रुपात येईल आणि तुमच्याशी फुगडी, पावटी, रिंगण, खेळेल ... चालेल !”.... “ अरे पण , आम्ही ओळखायचे कसे ?” सर्व एकाच सुरात म्हणाले. “ते तुमचं तुम्ही पाहा.” पांडुरंग मिश्कील हसत म्हणाला. सगळीच मंडळी विचारात पडली. “आणि हो” पांडुरंग पुन्हा म्हणाला, “ मी तुम्हाला थकवापण येवू देणार नाही. तुम्हाला कुणाला थकल्यासारखे वाटलेच , तर मी तुमचे पाय चेपून देईल व तुमचा थकवा दूर करेल .... हा ...पण ते सुद्धा गुपचूपच हं....!” देव आपले पाय चेपणार ! या संकल्पनेनेच  सारेजण सुखावले ... व जो तो स्वप्नरंजनात   मग्न झाला , ‘ आपण देवाशी फुगडी खेळत आहोत.... पावटी, रिंगण, कबड्डी, खो-खो, कुस्ती, खेळत आहोत.... कोण जिंकेल बरं ? ....आणि कोण हरेल ?... आणि एव्हढ खेळून थकल्यावर देव आपले पाय चेपणार.... तेंव्हा त्याला चटकन पकडायचे...आणि ओळखायचे.... ... तेव्हढ्यात देवाने मोठ्याने आवाज दिला, “ अरे कुठे रमलाऽऽऽत..... सांज आरतीची वेळ झाऽऽली.... मला मंदिरात जावे लागेल ... हा मी निघालोऽऽ... मग आषाढाच नक्की हं ऽऽ!.... असे म्हणून पांडुरंग मंदिराकडे धावला... भानावर येवून नामदेवही देवामागे धावला.
मंदिराच्या पायरीवरच माउली (पंढरपूरवासी लोक) वाट पाहत उभी होती. देव घाईघाईत देव्हाऱ्यात जावू लागला. माउली कडाडली “ थांब... कुठ होतास इतका वेळ.... आणि काय चालू होत इतका वेळ त्या टाळकुट्यांबरोबर.” पांडुरंग खाली मान घालून उभा होता. पाठीमागे नामदेवही धापा टाकीत आला. “ सांग ना, आता गप्प का ?” माउलीच्या आवाजाने टिपेचा स्वर गाठला होता. आता पांडुरंगासमोर गत्यंतरच नव्हते. त्याने भीतभीतच “ आषाढवारीचा सविस्तर वृत्तांत सांगितला” माउलीने (पंढरपूरवासी लोक) कपाळाला हात मारून घेतला. “ अरे हे कधीनवत येतात तरी एव्हढा धिंगाणा घालतात... आणि आतातर दर आषाढी एकादशीला सर्व एकत्रच... म्हणजे झालंच कल्याण.... त्यानंतर महिनाभर त्यांची घाणच आवरत बसाव लागणार... ते काही नाही... अजिबात जमणार नाही... मी त्यांना गावात पायसुद्धा ठेऊ देणार नाही.” माउलीचा (पंढरपूरवासी लोक) तो अवतार पाहून पांडुरंगाला रडूच फुटले. पांडुरंगाने धावत जावून माउलीच्या(पंढरपूरवासी लोक)  कमरेला मिठी मारली. डोळ्यातून आसवं गळत बोलू लागला, “ माउली (पंढरपूरवासी लोक)  असे काय करतेस... अग ते माझे सवंगडी आहेत ना ? मी त्यांच्याकडे नेहेमी जातो... मग त्यांनी वर्षातून एकदाही आपल्याकडे येवू नये काय ?.... आणि मी तुझे लेकरू आहे तशी ती नाही का गं तुझी लेकरं ? ... आणि लेकरांची घाण आवरायला माउली कधी कंटाळा करते होय ?” ... पांडुरंगाने माउलीच्या (पंढरपूरवासी लोक)  हृदयालाच हात घातला होता.  तिकडे दुर्लक्ष केल्यासारखे करीत माउलीने (पंढरपूरवासी लोक)  नामदेवांकडे मोर्चा वळविला, “ नामदेवा, तो पांडुरंग एक भोळा आहे. त्याला त्या  टाळकुट्यांनी भावनेच्याभरात फसविला. अरे पण तू तर शहाणा आहेस ना ? तुला नाही का अक्कल ? तू विरोध करायचा ना ?”
नामदेव खाली मान घालून म्हणाला, “ आई, तुझे म्हणणे खरे आहे. पण त्यांचही खरंच होते ना. एकच तर दिवस येणार आहेत ते. आणि त्यामुळे ते आपलं स्वत:च वर्षभराचे सुखदु:ख विसरणार असतील.... त्यांना त्या एक दिवसाने जगण्याची उमेद आणि ऊर्जा मिळणार असेल.... तर आपण थोडा त्रास नको का सहन करायला ? आणि या पांडुरंगाने त्यांना पायी येण्याची अट घातल्याने त्यांनाही तर त्रास होणारच आहे ना ? आणि आई तुला असे वाटते ना, ते घाण करतील, तर मी हा इथे पायरीवरच बसून राहील, त्या सर्वांच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर घेईल, मग तर झाले ?”... त्या दोघांच काकुळतीला आलेलं पाहून आता मात्र माउलीच्या (पंढरपूरवासी लोक)  डोळ्यात पाणी आलं...पांडुरंगाला व नामदेवाला जवळ घेवून मोठ्या ममतेने म्हणाली, “ बर बाबांनो येवू द्या तुमच्या सवंगड्यांना ..... खेळू द्या वाट्टेल तेव्हढे .... मी नाही चिडणार... आवरेल मी त्यांचं सर्व... झालं आता समाधान?” पांडुरंगाने नामदेवाला कडकडून मिठी मारली दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते.......

पांडुरंग विटेवर जावून उभा राहिला... नामदेवाने पंचारती घेतली... तीच्या प्रकाशात आज देवाचा चेहरा काही वेगळाच दिसत होता.......